नवी दिल्ली । चांद्रयान मोहिम यशस्वी झाल्यानंतर इस्त्रोने गगनयान मोहिम हाती घेतली आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेत भारत पहिल्यांदाच भारतीय अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहे. दरम्यान गगनयान मोहिमेसाठी पाठवण्यात येणाऱ्या अंतराळवीरांची नावं इस्त्रोने जाहीर केली आहेत. इस्त्रोने जाहीर केलेल्या प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्ण आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला या भारतीय वायुसेनेच्या चार टेस्ट पायलटना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस्ट्रोनॉट विंग्स परिधान केले आणि मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.
या चारही पायलटनी देशातील सर्व प्रकारची लढाऊ विमाने उडवली आहेत. प्रत्येक प्रकारच्या लढाऊ विमानांची कमतरता आणि त्यांची वैशिष्ट्यांची सर्व माहिती त्यांना आहे. त्यामुळे या पायलटची गगनयान अंतराळवीर प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना रशियामध्ये प्रशिक्षण मिळालं असून सध्या बेंगळुरू येथील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सुरू आहे. गगनयान मोहिमेसाठी आजर्यंत शेकडो वैमानिकांची चाचणी घेण्यात आली. यानंतर 12 जणांची निवड करण्यात आली. इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन (IAM) मध्ये त्यांची निवड झाली. यानंतर निवड प्रक्रियेच्या अनेक फेऱ्या पूर्ण झाल्या. त्यानंतर इस्रो आणि हवाई दलाने चार वैमानिकांची नावे निश्चित केली आहेत.
यानंतर इस्रोने 2020 या चारही पायलटना अंतराळ प्रशिक्षणासाठी रशियाला पाठवलं होतं. कोविड-19 मुळे त्यांच्या प्रशिक्षणाला उशीर झाला. मात्र 2021 मध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलं. तेव्हापासून अनेक प्रकारचे प्रशिक्षण घेतले जात आहे. इस्रोच्या ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये (HSFC) अनेक प्रकारचे सिम्युलेटर बसवले जात आहेत. ज्यावर चारही पायलट सराव करत आहेत. सतत उड्डाणचं प्रशिक्षण घेतलं जात असून फिटनेसकडेही लक्ष देत आहे. यातून दोन किंवा तीनच पायलटना गगनयान मोहिमेवर पाठवलं जाणार आहे.