पुणे । शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुण्यात युवक काँग्रेसने नुकतेच आंदोलन केले. यावेळी आंदाेलकांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या आंदाेलकांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार युवक काॅंग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरुद्ध पंजाब-हरियाना सीमेवर शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुण्यातील शहर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिराजवळ आंदोलन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पाेलिसांनी माेंदीचा प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेतला. त्यानंतर पाच कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. या आंदाेलनानंतर पाचही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी दिली. या घटनेचा पाेलिस तपास सुरु असल्याची माहिती देण्यात आली.