मुंबई । राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. आज विधानभवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अंमलबजावणी करणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या घोषणा झाल्याचे म्हणत शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला आहे. टेंडर मिळणारे कॉन्ट्रॅक्टर जोमात आणि शेतकरी कोमात. पहिल्या ज्या घोषणा होत्या त्याचं झालं. नवीन काहीतरी बोलायचं. मृगजळाच्या पाठी धावायला लावायचे. मराठी भाषेबद्दल काहीच नाही. मोदीजींच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन केले त्याच काय झालं. त्याची गॅरंटी कोण घेणार?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
जयंत पाटीलांचे टीकास्त्र
“निर्मला सीतारामन यांनी काही मर्यादा पाळल्या आणि अंतरिम बजेटमध्ये आहे त्याच गोष्टी कायम ठेवल्या. राज्यातील अर्थमंत्री यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना मागे पाडले. ९ हजार कोटींचे डेफिसिट बजेट मांडले. १ लाख कोटी वजा या सरकारकडे होते नवीन बजेट मांडताना महसुली तुटीचे बजेट मांडले. राज्य सरकारने फक्त निवडणुकीकडे पाहून लोकान काहीत्री देणार आहोत म्हणून अशा घोषणा केल्या आहेत. इंटरिम बजेट हे नार्मल असत पण त्यापुढे जाऊन घोषणा केल्या आहेत,” असे जयंत पाटील म्हणाले.
“या बजेटमधे बेरोजगारी दूर करण्याची ठोस अशी तरतूद नाही. रोजगार हिरावला जात आहे. देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होतात. हे इतके विचित्र आहेत की नथुराम गोडसेचे स्मारक देखील उभे करतील. राज्याचे प्रमूख ठाण्याचे मात्र राज्य नागपूर वरून चालते.महाराष्ट्राच्या अंतरिम बजेटमधे काहीही दिसला नाही. महाराष्ट्र पुनः खड्ड्यात घालण्याचे काम हे सरकार करत आहेत,” असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला.