राजगुरुनगर | खेड – आळंदी मतदार संघाचे बाबाजी काळेंना निधी कमी न पडू देण्याची जबाबदारी आमच्या पक्षाची – सचिन आहिर.*आमदार बाबाजी काळे हे सत्तेत नसले तरी निधी कमी पडणार नाही याची जबाबदारी आम्ही पक्षातील सर्व नेत्यांनी घेतली आहे. वेळप्रसंगी माझ्या वाट्याला आलेला निधी त्याचबरोबर खासदार संजय राऊत आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचा निधी या तालुक्यात वापरू परंतु या तालुक्यात विकासकामे कमी पडू देणार नाही याची जबाबदारी आता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली आहे असे मत माजी सचिन आहिर यांनी व्यक्त केले.
काळे विजयी झाल्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी आभार मेळावा आयोजित केला होता. यावेळी खेड तालुक्यातील महाविकस आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून महाविकास आघाडीचा केवळ एकच उमेदवार निवडून आला असल्याने बाबाजी काळे यांचे कौतुक होत आहे. याशिवाय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पुणे जिल्ह्यात एकमेव आमदार असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील पक्ष संघटना बळकट करण्याची जबाबदारी बाबाजी काळे यांच्यावर असल्याचे मत आहिर यांनी व्यक्त केले.
दरम्यान आमदार बाबाजी काळे यांनी देखील आगामी काळात शिवसेना पक्ष वाढीसाठी येत्या काळात संपूर्ण जिल्ह्यात जी जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
यावेळी गौतम चाबुकस्वार, रवी लांडगे, सुरेश भोर, अशोक खांडेभराड, सुधीर मुंगसे, रामदास धनवटे, संजय मोरे, दत्ता गांजळे, माऊली खंडागळे, अमोल पवार, संतोष डोळस यांसह जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.