राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका घेत या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे संकेत दिले. त्यामुळे महाराष्ट्रात आता भाजपचा मुख्यमंत्री होणार, हे निश्चित मानलं जात आहे.
मुख्यमंत्रिपद भाजपच्या वाट्याला येणार असलं तरी या पदाची धुरा भाजप श्रेष्ठींकडून नक्की कोणाच्या खांद्यावर दिली जाणार, हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. कारण अलीकडील काही वर्षांतील भाजप नेतृत्वाच्या निर्णयांचा इतिहास पाहता महाराष्ट्रातही धक्कातंत्राची शक्यता नाकारता येत नाही.
देवेंद्र फडणवीस: मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत भाजपमधून देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वांत आघाडीवर आहे. सलग पाच वर्ष राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या आणि मागील अडीच वर्षांत उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेल्या देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भाजपच्या संघटनेवर मजबूत पकड आहे. तसंच प्रशासकीय वर्तुळातही त्यांचा दरारा आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला राज्यात घवघवीत यश मिळालेलं असल्याने मुख्यमंत्रिपदासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांच्या नावाचा प्राधान्याने विचार केला जाऊ शकतो.
विनोद तावडे: महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य राहिलेले विनोद तावडे हे सध्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर तावडे यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र नंतरच्या काळात त्यांच्यावर पक्षाने राष्ट्रीय स्तरावर विविध जबाबदाऱ्या सोपवल्या. पक्षाने दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा तावडे यांच्यावरील विश्वास वाढला आहे. विनोद तावडे हे मराठा समाजातून येतात. त्यामुळे भाजपला राज्यात मराठा चेहरा द्यायचा असल्यास तावडे यांच्या नावाचाही मुख्यमंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पंकजा मुंडे : कधीकाळी राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत राहिलेल्या पंकजा मुंडे या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकीयदृष्ट्या कोंडीत सापडल्या होत्या. अनेकदा राज्यसभा आणि विधानपरिषदेसाठी नाव चर्चेत येऊनही त्यांना संधी मिळत नव्हती. मात्र अखेर पक्षाने काही महिन्यांपूर्वी त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्याचा निर्णय घेतला. राज्यात निर्माण झालेल्या मराठा-ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाची संधी देऊन ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्नही भाजपकडून होऊ शकतो.
सुधीर मुनगंटीवार : भाजप नेते आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही दीर्घ राजकीय अनुभव आहे. भाजपकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी ओबीसी चेहरा देण्याचा निर्णय झाल्यास मुनगंटीवार यांचं नावही आघाडीवर येऊ शकतं. मुनगंटीवार हे विदर्भातून येत असल्याने सत्तेचा प्रादेशिक समतोल राखण्यासही मदत होणार आहे.
मुरलीधर मोहोळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजप अनपेक्षित निर्णयांसह धक्कातंत्रासाठी ओळखला जातो. राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपने अनेक अनुभवी नेत्यांना बाजूला सारत नवख्या चेहऱ्यांना संधी दिल्याचं पाहायला मिळालं होतं. महाराष्ट्रातही तोच पॅटर्न अवलंबला गेल्यास मुरलीधर मोहोळ यांच्यासारख्या तरुण नेत्याचा विचार होऊ शकतो. पुण्याचे असलेले मुरलीधर मोहोळ हे मराठा समाजातील आहे. तसंच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी संबंधित असून भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा अशी त्यांची ओळख आहे. यंदा पहिल्यांदाच खासदार झालेल्या मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आलेलं आहे.