लोकसभेसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर! नितीन गडकरी, पंकजा मुंडेंसह २० जणांची नावं जाहीर
महाराष्ट्र, त्रिपुरा, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमधले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
पंकजा मुंडेंना लोकसभेसाठी संधी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत हिमचाल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, त्रिपुरा या राज्यातील उमेदवारांची नावं यामध्ये आहेत. विशेष म्हणजे नितीन गडकरी, पंकजा मुंडेंसह महाराष्ट्रातल्या २० उमेदवारांची नावं या यादीमध्ये आहेत. सुधीर मुनंगटीवार, मुरलीधर मोहोळ यांनाही लोकसभेचं तिकिट देण्यात आलं आहे. तर मुंबईतून गोपाळ शेट्टींचा पत्ता कट करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांना पहिल्यांदाच लोकसभेत नशीब आजमावण्याची संधी बीडमधून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या २० जणांची नावं भाजपाने जाहीर केली आहेत. आता आणखी किती जागा भाजपा घेणार आणि शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या वाट्याला किती जागा येणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
महाराष्ट्र भाजपा उमेदवारांची यादी
हिना गावित-नंदुरबार
सुभाष भामरे-धुळे
स्मिता वाघ-जळगाव
रक्षा खडसे-रावेर
अनुप धोत्रे-अकोला
रामदास तडस-वर्धा
नितीन गडकरी-नागपूर
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर
प्रतापराव चिखलीकर-नांदेड
रावसाहेब दानवे-जालना
भारती पवाण-दिंडोरी
कपिल पाटील-भिवंडी
पियूष गोयल-उत्तर मुंबई कोटेचा-मुंबई उत्तर पूर्व
मुरलीधर मोहोळ-पुणे
सुजय विखे पाटील-अहमदनगर
पंकजा मुंडे-बीड
सुधाकर श्रृंगारे-लातूर
रणजीत सिंह नाईक निंबाळकर-माढा
संजयकाका पाटील-सांगली
- हिमाचल प्रदेशात दोन उमेदवार, कर्नाटकातले २० उमेदवार, मध्यप्रदेशातले पाच उमेदवार, त्रिपुरातला एक उमेदवार, महाराष्ट्रातले २० उमेदवार आणि तेलंगणमधले ६ उमेदवार अशी ७० नावं या यादीत आहेत. या आधी जी यादी जाहीर करण्यात आली त्या यादीत १९५ नावं होती. नितीन गडकरींचं नाव पहिल्या यादीत का नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सातत्याने उपस्थित केला होता. तसंच त्यांना भाजपाला लाथ मारा आणि महाविकास आघाडीसह या अशी ऑफरही उद्धव ठाकरेंनी दिली होती. नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंकडून देण्यात आलेल्या या ऑफरची देवेंद्र फडणवीस यांनी खिल्लीही उडवली होती. आता दुसरी यादी जाहीर झाली असून त्यात भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर केल्याचं दिसून येतं आहे.