राजगुरुनगर : राजगुरुनगर न्यायालयात पश्चिम पट्ट्यातील एका बंटी व बबलीने बदललेले नावं नवरा बायको यांनी संमतीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केलेला होता. या खटल्यात दोघेही सुशिक्षित असून दोघांनाही परस्परात मतभेद होत असल्याने एकत्र रहावयाचे नाही. त्यामुळे त्यांनी हिंदू विवाह कायदा कलम १३ ब नुसार संमतीने घटस्फोट मिळण्याचा अर्ज मे. पी.एस. इंगळे यांच्या न्यायालयात दाखल केला होता.
या विवाह अर्जाच्या सुनावणीची पहिली तारीख दिनांक २७/०२/२०२४ रोजी नेमून देण्यात आलेली होती. यावेळी ई- फायलिंगद्वारे दाखल करण्यात आलेल्या या केस मध्ये सुनावणी होऊन, मेडीएशन होऊन एकाच दिवसात निकाल लावण्यात आला.
कौटुंबिक केसेस या वर्षानुवर्षे न्यायालयात चालत असतात. मात्र या खटल्यात न्यायालयाने एका दिवसात सुनावणी घेऊन निकाल दिल्याने न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
या केस मध्ये प्रथमच पेपरलेस ऑनलाईन केस चालवण्यात आली. सध्या ऑनलाईन केसेस चालवणे न्यायालयात सुरू झाले आहे. या केस मध्ये पाच न्यायाधीशांच्या न्या.संजय कौल, न्या.संजीव खन्ना, न्या. ओक, न्या. विक्रम नाथ,न्या. जे.के.माहेश्र्वरी यांनी राज्यघटनेतील अनुच्छेद १४२ प्रमाणे संमतीने घटस्फोट देताना लागणारा सहा ते आठ महिन्याचा कालावधी हा न्यायालयाच्या विशेष अधिकारात कमी करता येऊ शकतो असा निकाल २०२३ मध्ये दिला होता या निकालाचा संदर्भ घेत सदरचा घटस्फोट अर्ज निकाली करण्यात आला.या केस मध्ये पती तर्फे ॲड. प्रमोद सहाणे तर पत्नी ॲड. निलेश आंधळे यांनी काम पाहिले. या निकालाचे समाजातून स्वागत केले जात आहे.
“न्यायालयात न्याय मिळण्यासाठी अनेक नागरिक केसेस दाखल करत असतात. मात्र न्यायालयात वेळेत न्याय निर्णय होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. मात्र या विवाह अर्जात झालेल्या घटस्फोटाच्या निकालाने न्यायालयात जर योग्य रीतीने केस मांडली तर न्याय मिळतो असे उदाहरण समाजासमोर आलेले आहे.”…..ॲड. निलेश बाळासाहेब आंधळे#