राज्यात भावी पिढी घडवणाऱ्या युवकांसाठी चांगली बातमी आहे. आता राज्यातील ११ हजार ८५ उमेदवारांचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. गेल्या २० वर्षांतील ही राज्यात सर्वात मोठी शिक्षक भरती आहे. या भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. शिक्षकांच्या २१ हजार ६७८ जागांपैकी मुलाखत न देता १६ हजार ७९९ पदांची भरती करण्यात येणार होती. त्यातील आता ११ हजार ८५ उमेदवारांची गुणवत्ता यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात आली.
अशी होती प्रक्रिया
राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त होत्या. त्यामुळे एकूण १ हजार १२३ खाजगी संस्थांनीही भरतीसाठी मागणी केली होती. या शाळांमधील ५ हजार ७२८ रिक्त पदांसाठी प्रक्रिया घेण्यात आली. तसेच राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये १२ हजार ५२२ शिक्षकांची पदे रिक्त होती. राज्यातील विविध मनपामध्ये २ हजार ९५१ तर नगरपालिकांमध्ये ४७७ पदे रिक्त होती. यामुळे राज्यातील एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांसाठी जाहिराती दिल्या होत्या. ही सर्व प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत करण्यात आली.
किती जागा रिक्त, मग पुढे काय…
मुलाखतीशिवाय निवडीसाठी संस्थांसाठी १ लाख ३७ हजार ७७३ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. तर मुलाखतीसह पदभरतीसाठी संस्थासाठी १ लाख ३३ हजार २७७ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. पहिली ते पाचवी इंग्रजी माध्यमात १ हजार ५८५ जागा रिक्त राहिल्या आहेत. मराठी माध्यमत ८७० जागा रिक्त असून उर्दू माध्यमाच्या ६४० जागा रिक्त आहेत